कित्येक वर्षांची मागणी पूर्ण : प्रति किलोमीटर तीन रुपये वाढ
प्रतिनिधी /पणजी
पर्यटक प्रवासी टॅक्सी भाडे दरात प्रति कि.मी. मागे रु. 3 वाढ देण्यात आली असून डिजिटल मीटर न बसवल्यास सुमारे 2934 टॅक्सीचे परवाने रद्द करण्याचा इशारा वाहतूक खात्याने दिला आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली असून मीटरसाठी आरक्षण करण्याची केंद्रे 4 वरुन 8 करण्यात आल्याचे ते म्हणाले.
इंधन दरात मोठी दरवाढ झाल्यामुळे भाडे दरात वाढ करण्याची मागणी टॅक्सी चालक मालकांकडून सातत्याने करण्यात येत होती. तशी वाढ करण्याचे आश्वासन गुदिन्हो यांनी दिले होते. त्यानुसार आता प्रति कि.मी. मागे रु. 3 या दराने भाडेवाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. प्रति कि.मी. मागे रु. 21 असा दर होता तो आता रु. 24 असा करण्यात आला आहे. नवी दरवाढ लागू झाल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली.
डिजिटल मीटर खर्च परतफेड योजनेची पुनर्रचना करण्यात आली असून मीटर बसवल्यानंतर तीन/ चार आठवडय़ांऐवजी 4 दिवसात टॅक्सीचालक-मालक मीटरची 50 टक्के रक्कम मागू शकतात आणि त्यांना ती मिळणार आहे. शिल्लक 50 टक्के रक्कम मीटरच्या नूतनीकरणावेळी एका वर्षभरात अदा केली जाणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
डिजिटल मीटर न बसविलेल्या 2934 टॅक्सीचे परवाने रद्द
नेंदणी क्रमांक 0 व 1 (शेवटचा अंक) असलेल्या टॅक्सी चालकांना- मालकांना 25 जुलैपर्यंत डिजिटल मीटर बसवण्याची मुदत वाहतूक खात्याने दिली होती. त्या कालावधीत फक्त 137 जणांनी वाहनांवर मीटर बसवले. इतरांनी दुर्लक्ष केले. सध्या 500 जणांनी मीटरसाठी आरक्षण केले असून उर्वरित 2934 टॅक्सीचे परवाने रद्द करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोंदणी क्रमांक 2 व 3 (शेवटचा अंक) असलेल्या वाहनांसाठी मीटर बसवण्याकरीता आरक्षण सुरु करण्यात आले असून त्यांना मीटर बसवण्याचे काम चालू झाल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले.