रस्तारोखो करण्याचा इशारा : मंगळवार 20 पर्यंत मुदतवाढ ,आझाद मैदानावर आंदोलन सुरच
प्रतिनिधी / पणजी
गेल्या कित्येक दिवसांपासून येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या टॅक्सी मालकांच्या आंदोलनात आता टॅक्सी मालकांच्या कुटुंबातील महिला सक्रीय झाल्या असून मागण्या पूर्ण झाल्या नाही तर रस्तारोखो करू असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारवर टीकास्त्र सोडून तोंडसुख घेतले. मागणी पूर्ण झाली नाही तर पुढील निवडणुकीच्यावेळी आमच्या दारावर मते मागायला याल तर घबरदार अशी धमकीही महिलांनी दिली आहे.
टॅक्सी मालकांना येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यासाटी दिलेली मुदत 14 एप्रिल रोजी संपल्यानंतर आता त्यांना 20 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सध्यातरी आझाद मैदानावर आंदोलन सुरुच रहाणार असल्याचे टॅक्सी मालकांनी सांगितले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच रहाणार आहे या मुद्यावर टॅक्सी मालक ठाम असून आता त्यांना मुदत वाढही मिळाली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या टॅक्सी मालकांच्या आंदोलनात गेल्या दोन दिवसांपासून टॅक्सी मालकांचे कुटुंबीयांनीही सहभाग घेतला आहे. मुलांच्या परीक्षा त्यात घरची कामे सोडून बायकामुलांसह टॅक्सी मालकांनी येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. सरकारला आता तरी आमची दया येणार का असा प्रश्न टॅक्सी मालकांच्या महिलांनी उपस्थित केला आहे.
सरकारचे अटी नियम मान्य करण्यासाठी आम्ही बोलणी करायला तयार आहे मात्र अगोदर गोवा माईल्स रद्द करा या मतावर टॅक्सी मालक ठाम आहे असे टॅक्सी मालकांनी सांगितले. काल गुरुवारी कँग्रसचे ऍड. यतीश नाईक, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, तसेच इतर अनेक राजकीय पक्षनेते तसेच बिगर सरकारी संस्थेचे पदाधिकारी आम्हाला भेटून पाठींबा असल्याचे जाहिर केले आहे. टॅक्सी मालक आपल्या मतावर ठाम आहे. राज्यात वाहतूक व्यवसाय करणारे बस, टेंम्पो व इतर वाहतूक व्यवसाय करणाऱयांनी आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आवाहन टॅक्सी मालकांनी केले आहे.