प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका व्याप्तीमधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंदे सुरू करण्यात आली होती. मात्र आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती रखडल्याने आरोग्य केंदे बंद पडली आहेत. टेंगीनकेरी गल्ली येथील आरोग्य केंदाचा लाभ परिसरातील रहिवाशांना होतो. त्यामुळे येथील बंद पडलेले आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन विविध मुस्लीम संघटनांच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
शहरातील इतर भागासह टेंगीनकेरी गल्ली येथे महापालिकेच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चालविण्यात येत होते. 60 वर्षांपासून सुरू असलेले आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत हटवून दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. पण रस्ता रुंदीकरण करताना इमारतीच्या पायऱया हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीमध्ये जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ गरजू आणि गरीब लोकांना होत होता. रोजंदारी काम करणाऱया कामगारवर्गासाठी आरोग्य केंद्र लाभदायक होते. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मोफत तसेच माफक दरात औषधोपचार होत असे. मात्र सदर आरोग्य केंद्र बंद करण्यात आल्याने गैरसोय होत आहे.
नव्याने इमारत बांधण्यात आल्यानंतर आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले तरी अद्याप आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यात औषधोपचार घ्यावा लागत आहे. परिणामी गरीब लोकांवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे सदर आरोग्य केंद्र सुरू करून सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
टेंगीनकेरी गल्ली येथील इत्तेहाद यंग कमिटी बासीबन मुस्लीम जमात, मोमिन बडा मस्जिद जमात, करिमदाद खान मस्जिद, बागवान-वा-कोतवाल मोहल्ला जमात अशा विविध संघटनांनी मागणीचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनाच्या प्रत महापालिकेला तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हा पालकमंत्री आणि आमदार, जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.