ऑनलाईन टीम / पुणे :
कोविड -19 अर्थात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा भारतासह संपूर्ण जगातील प्रत्येक घटकावर अत्यंत खोलवर परिणाम झाला आहे. यात अनेकांच्या उद्योग, नोकऱ्यांवर परिणाम झाला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लावल्यामुळे परिवाराची आर्थिक स्थिती डगमगली. याचा परिणाम कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर देखील झाला. भल्यामोठ्या शिक्षण संस्थांच्या फी भरणे या काळात पालकांना अशक्य होऊन बसले. अशाच काळात तंत्रज्ञानाची रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील ‘टेकिला अॅकॅडमी’ पुढे आली.
टेकिला ग्लोबल सर्व्हिसेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितिज अग्रवाल यांनी अॅकॅडमीची स्थापना 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनानिम्मित करण्यात आली. त्यानंतर या अकॅडमीमध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे.
ते म्हणाले, सेल्सफोर्स हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 25 हजार ते एक लाख मोजावे लागतात. हा एवढा खर्च आताच्या कोरोना काळात करणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही दरमहा 100 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले पण पहिल्याच महिन्यात आमच्याकडे 100 पेक्षा अधिक नोंदणी झाली, यामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
टेकिला अॅकॅडमीच्या अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात चार सत्रे असतात. मार्केटिंग क्लाउड, सेल्सफोर्स अॅडमीन, सेल्सफोर्स डेव्हलपमेंट आणि परडोट. प्रशिक्षण कालावधी हा 2 महिने असून यात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती देण्यात येते ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होतो.