60 हून अधिक लोकांना त्वचादाहाचा त्रास
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात रविवारी मुलांच्या स्वीमिंग पूलमध्ये रसायन गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 हून अधिक जणांना त्वचादाह आणि श्वास घेण्यास त्रास झाला आहे. 26 जणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे लागले तर 39 जणांवर उपचार करण्याची गरज भासली नाही. या दुर्घटनेनंतर अम्यूजमेंट पार्क बंद करण्यात आले आहे.
स्प्रिंगच्या सिक्स फ्लॅग्स हार्बर स्प्लॅशडाउनमध्ये झालेल्या गळतीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गळतीमध्ये हायपोक्लोराइट सोल्युशन आणि 35 टक्के सल्फ्युरिक ऍसिड सामील होते असे मानले जात आहे. गळतीत सल्फ्युरिक ऍसिड अणि ब्लीच सामील होते असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
सद्यकाळात परिसरातील हवेची गुणवत्ता चांगली आहे. रसायन गळतीची कुठलीच तक्रार नाही. तरीही लोकांनी तेथे जाणे टाळावे असे हॅरिस काउंटीच्या न्यायाधीश लीना हिडाल्गो यांनी म्हटले आहे.
स्वीमिंग पूलमध्ये असताना मुलांना त्वचेचा दाह होत असल्याची तक्रार केली होती. 3 दिवसांपूर्वी न्यू जर्सीच्या सिक्स फ्लॅग्स ग्रेट ऍडव्हेंचरमध्ये वॉटर राइटचे प्रकरण समोर आले होते. यामुळे दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.