बेळगाव : शारदोत्सव सोसायटी आयोजित ‘टेझर हंट’ ही स्पर्धा मोठय़ा चुरशीची व रोंमांचक ठरली. रविवारी सकाळी आरपीडी- जीएसएस येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळी 7 वा. या स्पर्धेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी संरक्षण खाते कोणत्या मंत्र्यांनी भूषविले. दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगणे, ठराविक पदार्थ कशापासून तयार होतो. 22 आणि 24 यार्डमध्ये आपले आयुष्य गेले असे कोण म्हणाले अशा तऱहेचे एकूण 10 प्रश्न स्पर्धकांना देण्यात आले.
स्पर्धकांनी त्याची उत्तरे दिल्यानंतर त्यांना टेझर हंट स्पर्धेसाठी क्लू दिले गेले. इथे थांबतात घोडे, आमच्याकडे दारे नाहीत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, लिटल मास्टरची डेन, इथे भरल्यापोटी नाती जुळतात, वसुंधरेचा खजिना चमकतो, कुहू कुहु कोकिळ बोले, नाचू गाऊ, ऐकू आणि बोलू, उर्जा, चंद्र तारे, भूक भागते मनाची यासह एकूण 15 क्लू दिले गेले. स्पर्धक महिलांनी संपूर्ण परिसर पालथा घालून हे क्लू शोधले. ‘थांब तुला शिकविन चांगलाच धडा या क्लूने स्पर्धकांना दमविले. बऱयाच स्पर्धकांना हा क्लू म्हणजे प्राचार्यांचे दटावणे असे वाटले. परंतु प्रत्यक्षात याचा संदर्भ खुल्या रंगमंचावरील पू. ल. देशपांडे रंगमंचाशी होता. अर्थात तो शोधून काढण्यात स्पर्धक यशस्वी झाल्या व शारदोत्सव सुवर्ण हा शब्दही त्यांनी शोधून काढला.