पॅरालिम्पिक्समध्ये रचला नवा इतिहास, अंतिम फेरीत पोहोचणारी पहिलीच भारतीय
टोकियो / वृत्तसंस्था
टेबलटेनिसपटू भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिक्समध्ये अंतिम फेरीत धडक मारत शनिवारी नवा इतिहास रचला. तिने टेबलटेनिस इव्हेंटमधील उपांत्य लढतीत चीनच्या मियाओ झँगचा 3-2 अशा फरकाने पराभव करत शेवटच्या दोनमध्ये धडक मारली.
34 वर्षीय भाविनाबेन पटेलने या पॅरालिम्पिक्समधील आपल्या दर्जेदार कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वास्तविक, जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित झँगचे आव्हान तगडे होते आणि उपांत्य फेरीत तीच विजयासाठी दावेदार मानली जात होती. पण, प्रत्यक्ष लढतीत भाविनाबेनने अनुभव पणाला लावत विजय अक्षरशः खेचून आणला. 34 मिनिटे चाललेल्या उपांत्य लढतीत तिने 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 अशा फरकाने विजय प्राप्त केला. आता रविवारी या इव्हेंटमधील अंतिम लढतीत भाविनाबेनचा मुकाबला चीनचीच आणखी एक पॅडलर यिंग झोयू हिच्याविरुद्ध होईल.
गुजरातेतील महसाणा जिल्हय़ातील सुंधिया खेडय़ातील रहिवासी असणाऱया भावनाबेनला टोकियोत दाखल झाल्यानंतर पदक जिंकण्याचा विश्वास नव्हता. पण, येथे आपली पदार्पणाची पॅरालिम्पिक्स गाजवत तिने अंतिम फेरीत धडक मारणे स्वप्नवत ठरले. ‘इथे पोहोचल्यानंतर मी 100 टक्के प्रयत्न करेन, याची खात्री होती. पण, पदक निश्चित करता येईल, याची खात्री नव्हती’, असे भाविनाबेन म्हणाली. 12 महिन्यांची असताना भाविनाबेनला पोलिओने पछाडले होते.
व्हीलचेअरवरुन खेळणाऱया भाविनाबेनला उपांत्य लढतीतील पहिला गेम गमवावा लागला होता. पण, नंतर ओळीने दोन गेम जिंकत तिने उत्तम कमबॅक केले. तिसरा गेम केवळ 4 मिनिटात जिंकत तिने आपला फॉर्म दाखवून दिला. चौथ्या गेममध्ये झँगने आघाडी मिळवली. मात्र, पाचव्या निर्णायक गेममध्ये पटेलने दमदार विजय संपादन करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. या इव्हेंटमध्ये शुक्रवारी भाविनाबेनने 2016 रिओ पॅरालिम्पिक्स सुवर्णजेती सर्बियन प्रतिस्पर्धी बोरिस्लाव्हावर मात करत किमान पदक निश्चित केले होते. आता तिने अंतिम फेरीत जोरदार धडक मारली आहे.