वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
व्यावसायिक टेनिसपटूंच्या संघटनेचा अध्यक्ष नोव्हॅक जोकोव्हिकसह राफेल नदाल व रॉजर फेडररसारख्या दिग्गजांनी जागतिक क्रमवारीत तळाच्या टेनिसपटूंसाठी ‘कोरोना मदतनिधी’ ची योजना आखली आहे. टेनिस क्रमवारीत 250 पेक्षा खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार डॉलरची मदत करण्याच्या या योजनेचे स्वागत होत आहे, मात्र ऑस्ट्रियन टेनिसपटू डॉमनिक थिएमने मात्र आपण या योजनेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच मी मदत करणार असल्याची माहिती थिएमने दिले.
सध्याच्या
घडीला डॉमनिक थीम हा जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानी आहे. कोरोनामुळे टेनिसच्या स्पर्धा
रद्द झाल्या असल्या तरी कोणत्याही टेनिसपटूचे हाल होत असतील याबाबत मात्र शंका आहे.
याउलट, कोणताही टेनिसपटू मोठय़ा आर्थिक संकटात सापडला असेल तर त्याला आपण मदत करणार
असल्याचे थिएमने सांगितले. ‘मी फ्युचर्स दर्जाच्या स्पर्धा दोन वर्ष खेळलो आहे आणि
यात बरेचसे खेळाडू पूर्ण गांभिर्याने खेळत नाहीत. अशा लोकांना मी पैसा का द्यावा, हे
कळत नाही. यापेक्षा खरोखर गरज असेल अशा संस्था किंवा व्यक्तींच्या मदतीसाठी मी पुढाकार
घेणार असल्याचे थिएमने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, थिएम हा आंतरराष्ट्रीय टेनिसमधील
आघाडीचा खेळाडू असून त्याची कमाई 24 दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास आहे.
एटीपी क्रमवारीतील पहिल्या शंभर क्रमांकाचे खेळाडू, दुहेरीतील
पहिल्या 20 क्रमांकाचे खेळाडू, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) आणि
ग्रँडस्लॅम स्पर्धा आयोजक मिळून हा मदतनिधी उभारणार आहेत.
यासाठी जागतिक टेनिस क्षेत्रातील रॉजर फेडरर, नोव्हॅक जोकोव्हिक व राफेल नदाल यांनी
पुढाकार घेतला आहे.