पुणे / प्रतिनिधी
माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड व माजी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपिचंद यांनी आपापल्या खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू घडविले आहेत. त्याप्रमाणेच दर्जेदार खेळाडू मला टेनिसमध्ये घडवायचे आहेत. मी प्रशिक्षित केलेला खेळाडू ऑलिंपिकमध्ये व ग्रँड स्लॅममध्ये खेळावा, हे माझे स्वप्न आहे, अशा शब्दांत भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने शुक्रवारी आपला निर्धार बोलून दाखविला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित तिसऱया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेदरम्यान पत्रकारांशी बोलताना पेस म्हणाला, राहुल द्रविड व पुल्लेला गोपीचंद यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी तरुण पिढीला सर्वोच्च पातळीचे प्रशिक्षण दिले आहे. सुविधांअभावी 2001 मध्ये ऑल इंग्लंड विजेतेपद मिळविणाऱया गोपीचंदने सध्या बॅडमिंटनच्या प्रतिभेचे पालनपोषणच केले नाही, तर देशासाठी दोन ऑलिंपिक पदकविजेतेपद मिळवून देणारे खेळाडूही घडवले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडनेही निवृत्तीनंतर क्रिकेटमधील युवा खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले आहे. मला माझ्या दुसऱया पर्वात देशाकडून ऑलिंपिक पदकविजेता किंवा ग्रँड स्लॅम विजेता तयार करायचा आहे. या पर्वाची खूप उत्सुकता आहे. मला हे माहीत नाही, की मला हवे तसेच घडेल. मात्र, मी प्रशिक्षित केलेला खेळाडू टेनिसचे मैदान गाजवेल, हे स्वप्न आहे.
टेनिसमध्ये बदल आवश्यक
आयपीएल, प्रीमियर बॅडमिंटन लीग, अल्टिमेट टेबल टेनिससारख्या लीगमध्ये स्पर्धा मोठी आहे. अधिक मुलांना आकर्षित करण्यासाठी टेनिसमध्येही इतर खेळांप्रमाणेच बदल करावे लागतील. टेबल टेनिस, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, कबड्डी या खेळांमध्येही लीग आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर खेळले जातात. त्यामुळे भारतीय टेनिसमध्ये काही बदल क्रमप्राप्त ठरतात, याकडे त्याने लक्ष वेधले.
भरकटण्याऐवजी टेनिस उत्तम पर्याय
दरम्यान, पेसचा तिसऱया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील हा शेवटचा सहभाग आहे. आजकाल मुलांना भरकटवणारी अनेक माध्यमे आहेत. त्यासाठी मुलांना चांगल्या गोष्टींकडे आकर्षित करणे महत्त्वाचे आहे आणि टेनिस खेळ हा एक उत्तम पर्याय आहे, असेही त्याने सांगितले.