क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना व संगम बैलूर टेबल टेनिस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पॅरा टेबल टेनिसच्या जागृतीसाठी गुरूवारी काढण्यात आलेल्या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेहरूनगर येथील मुजावर आर्केड येथून टेबलटेनिस जनजागृती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा म्हणाल्या, आजच्या खेळाडूंना मानसिक दबाव सहन करण्याची शक्ती नसते. त्यासाठी नियमित योगा व प्राणायाम करावेत. याशिवाय नियमित सराव केल्याने खेळाडूंना नक्कीच यश मिळते. त्यासाठी प्रशिक्षकांनी दिलेला सल्ला आत्मसात केल्यास निश्चितच ध्येय गाठता येते. दिव्यांग खेळाडूंनीही पॅरा ऑलिंपिकमध्ये आपले कौशल्य दाखविले आहे. भारताचे माजी पॅरा ऑलिंपिक संघाचे कर्णधार संजीव हम्मण्णावर हे त्याचेच एक उदाहरण आहे. आपल्या प्रदर्शनाने त्यांनी बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दिव्यांग असले तरी खचून न जाता प्रयत्न केल्यास आपणास यश मिळू शकते.
या रॅलीला बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे पदाधिकारी, टेबल टेनिसपटू व क्रीडाप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी डीसीपी नेहा यांनी टेबल टेनिसपटूसमवेत काही वेळ सराव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजीव हम्मण्णावर यांनी केले.