नवी दिल्ली : भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्याविरूद्ध मॅचफिक्सिंगचा आरोप केल्याच्या प्रकरणाची चर्चा करण्याकरिता अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी बोलाविली आहे.
मनिका बात्राच्या या आरोपानंतर अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या ऑलिंपिक पात्र फेरीच्या सामन्यात आपल्याला पराभव स्वीकारून सामना फेकण्यास रॉय यांनी सांगितले होते, असा आरोप बात्राने केला आहे. शनिवारी होणाऱया बैठकीला मनिका बात्रा आणि प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांची चौकशी समितीसमोर सुनावणी होणार आहे. सध्या सोनेपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस शिबिरामध्ये मनिका बात्रा आणि जी. साथियन असून ते येत्या दोन दिवसांमध्ये दाखल होणार असल्याचे फेडरेशनचे सचिव बॅनर्जी यांनी सांगितले. 2018 आशियाई स्पर्धेनंतर भारतीय टेबल टेनिस संघाला पूर्ण वेळ प्रशिक्षक लाभलेला नाही. कोरोना महामारी समस्येमुळे फेडरेशनला जवळपास गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करता आलेली नाही.