शाहबाज-कार्तिकच्या वादळात राजस्थानचा संघ नेस्तनाबूत, उभयतांची 33 चेंडूत 67 धावांची आतषबाजी निर्णायक
मुंबई / वृत्तसंस्था
आघाडीचे पाच फलंदाज अवघ्या 87 धावांमध्ये तंबूत परतले असतानाही शाहबाज अहमद (26 चेंडूत 45) व दिनेश कार्तिक (23 चेंडूत नाबाद 44) या जोडीने सनसनाटी, चौफेर फटकेबाजी केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने ‘टेबल टॉपर्स’ राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आणि यंदाच्या आयपीएल साखळी फेरीत सर्वात आश्चर्यकारक निकाल नोंदवला. शाहबाज व दिनेश कार्तिक या जोडीने अवघ्या 33 चेंडूत 67 धावांची आतषबाजी करत आरसीबीसाठी विजय खेचून आणण्याची जबाबदारी अगदी चोख पार पाडली.
जोस बटलरने अर्धा डझनभर षटकारांसह तडफदार अर्धशतक साजरे केले असले तरी तो राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. राजस्थानने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर 3 बाद 169 धावा केल्या तर प्रत्युत्तरात आरसीबीने 19.1 षटकात 6 बाद 173 धावांसह स्पृहणीय विजय संपादन केला.
विजयासाठी 170 धावांचे आव्हान असताना प्लेसिस (29) व अनुज रावत (25 चेंडूत 26) यांनी 7 षटकात 55 धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहली (5), डेव्हिड विली (0) व रुदरफोर्ड (5) स्वस्तात बाद झाल्याने राजस्थानचे मनोबल उंचावले. मात्र, याचवेळी शाहबाज व दिनेश कार्तिक ही जोडी क्रीझवर आली आणि त्यांनी राजस्थानच्या हरएक गोलंदाजावर तुटून पडण्याचा सिलसिला सुरु केला. या दोघांच्या हल्ल्यातच राजस्थानचा संघ खऱया अर्थाने गारद झाला.
प्रारंभी, जोस बटलरने नाबाद 70 धावांची आक्रमक खेळी साकारल्यानंतर राजस्थानने येथील आयपीएल साखळी सामन्यात 3 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. मागील लढतीत झंझावाती शतक झळकावणाऱया बटलरने तोच फॉर्म वानखेडेच्या स्लो ट्रकवर देखील कायम राखला. शिवाय, त्याला शिमरॉन हेतमेयरची (31 चेंडूत नाबाद 42) उत्तम साथ लाभली. बटलर-हेतमेयर जोडीने 83 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
राजस्थान रॉयल्सला पॉवर प्लेमध्ये अजिबात सूर सापडला नाही आणि पहिल्या 6 षटकांमध्ये त्यांना 1 बाद 35 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. यशस्वी जैस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाल्याने संघाची खराब सुरुवात झाली.
बटलर व देवदत्त पडिक्कल (29 चेंडूत 37) यांनी पॉवर प्लेनंतर मोठे फटके मारण्यावर भर दिला आणि 70 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आरसीबीच्या खराब क्षेत्ररक्षणाची देखील राजस्थानला साथच लाभली. एकदा तर आकाश दीपच्या एकाच षटकात बटलरला चक्क 2 जीवदाने मिळाली. बटलरने नंतर त्याच षटकात आकाशला उत्तुंग षटकार खेचत आरसीबीच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले.
त्यानंतर डावखुऱया डेव्हिड विलीच्या (1-29) पुढील षटकात पडिक्कलला देखील सोपे जीवदान लाभले. पडिक्कलने 2 चौकार व 2 षटकार खेचले. आरसीबीतील माजी संघसहकारी हर्षल पटेलने पडिक्कलला बाद केले तर रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हसरंगाला षटकार खेचल्यानंतर लगोलग परतीचा झेल देत बाद झाला. स्लॉग ओव्हर्समध्ये राजस्थानला फारशी फटकेबाजी जमली नाही आणि यानंतर त्यांना 20 षटकात 3 बाद 169 धावांवर समाधान मानावे लागले होते.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 3 बाद 169 (जोस बटलर 47 चेंडूत 6 षटकारांसह नाबाद 70, शिमरॉन हेतमेयर 31 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 42, देवदत्त पडिक्कल 29 चेंडूत 37. डेव्हिड विली, हसरंगा, हर्षल पटेल प्रत्येकी 1 बळी).
आरसीबी ः 19.1 षटकात 6 बाद 173 (शाहबाज अहमद 26 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 45, दिनेश कार्तिक 23 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह नाबाद 44, हर्षल पटेल 4 चेंडूत नाबाद 9, अनुज रावत 25 चेंडूत 26, फॅफ डय़ू प्लेसिस 20 चेंडूत 5 चौकारांसह 29).
अवघ्या 11 चेंडूत 4 बळी गमावले, तरीही आरसीबी जिंकली!
आरसीबीने 170 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 11 चेंडूंच्या अंतरात चक्क 4 बळी गमावले आणि त्यांची एकवेळ 4 बाद 62 अशी पडझड झाली. मात्र, कार्तिक व अहमद यांनी धुवांधार फटकेबाजी करत आरसीबीसाठी लक्षवेधी विजय साकारुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला.