एनआयएकडून कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने मंगळवारी सकाळी श्रीनगरमध्ये एका काश्मिरी पत्रकाराला अटक केली आहे. इरफान महाराज असे या पत्रकाराचे नाव असून तो श्रीनगरचाच रहिवासी आहे.
काही स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांचे लष्कर-ए-तोयबा, हिज्ब-उल-मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. या स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट जमविण्यात आलेली रक्कम काश्मीर खोऱयात दहशतवाद फैलावण्यासाठी देत असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि भारताच्या अन्य हिस्स्यांमधून अनेक मार्गांद्वारे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. तसेच या कथित स्वयंसेवी संस्था भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठीच स्थापन करण्यात आल्या आहेत. या एनजीओंकडून भारतविरोधी मजकूर प्रकाशित केला जात असतो असे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
यापूर्वी याप्रकरणी इरफानची चौकशी करण्यात आली होती. यानंतर सोमवारी संध्याकाळी पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला नवी दिल्ली येथे आणले गेले. याचदरम्यान पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी या कारवाईची निंदा केली आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हा हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.