वृत्तसंस्था/ हरारे
हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी बांगलादेश विरुद्ध यजमान झिंबाब्वेन चहापानापर्यंत पहिल्या डावात 5 बाद 244 धावात जमविल्या होत्या. झिंबाब्वे संघाचा कर्णधार ब्रेन्डॉन टेलर आणि कायतानो यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 468 धावांचा डोंगर उभा केला आहे. बांगलादेशच्या या धावसंख्येला झिंबाब्वेच्या फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. उपाहारापर्यंत झिंबाब्वेने 2 बाद 209 धावापर्यंत मजल मारली होती. झिंबाब्वेच्या डावाला सलामीचा शुंबा आणि कायतानो यांनी सावध सुरुवात करून देताना 61 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या शकीब अल हसनने शुंबाला पायचीत केले. त्याने 7 चौकारासह 41 धावा जमविल्या. विलियम्सच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱया टेलरने कायतानोसमवेत दुसऱया गडय़ासाठी 115 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने टेलरला झेलबाद केले. त्याने 92 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह 81 धावा जमविल्या. उपाहारावेळी झिंबाब्वेने 2 बाद 209 धावापर्यंत मजल मारली होती.
उपाहारानंतर बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेने 3 फलंदाज लवकर गमविले. मेयर्सने 65 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमविल्या. मेरुमा आणि केया यांना आपले खातेही उघडता आले नाही. कायतानो 9 चौकारासह 82 तर छकब्वा 10 धावावर खेळत आहेत. 96 षटकाअखेर झिंबाब्वेने 5 बाद 244 धावापर्यंत मजल मारली आहे. झिंबाब्वेचा संघ अद्याप 224 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत. बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने 3 तर टी. अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प. डाव ः सर्वबाद 468, झिंबाब्वे प. डाव 96 षटकात 5 बाद 244 (शुंबा 41, कायतानो खेळत आहे 82, टेलर 81, मेयर्स 27, मेरुमा 0, केया 0, छकब्वा खेळत आहे 10, शकीब अल हसन 3-74, टी. अहमद 1-46, मेहदी हसन 1-67). (धावफलक चहापानापर्यंत)