दोन लाखावर रुग्णांना लाभ : राज्यात 35 लाख जणांनी घेतले उपचार : कोविडकाळातही रुग्णांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या ई-संजीवनी ऍपच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेण्यात कर्नाटकात बेळगाव आघाडीवर आहे. यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे. देशात अशा पद्धतीने उपचार घेण्यातही राज्य वरच्या स्थानी आहे.
ई-संजीवनीच्या माध्यमातून बेळगाव जिल्हय़ातील 2 लाख 21 हजार जणांनी डॉक्टरांशी संपर्क साधून टेलिमेडिसीनद्वारे उपचार घेतले आहेत. बेळगावच्या खालोखाल बळ्ळारी जिल्हय़ात 2 लाख 16 हजार जणांनी, चिक्कमंगळूर जिल्हय़ातील 2 लाख 9 हजार तर बेंगळूर शहरात 1 लाख 27 हजार जणांनी या पद्धतीने उपचार घेतले आहेत.
राज्यातील 35 लाख 19 हजार जणांनी ई-संजीवनी माध्यमातून उपचार घेतले आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये राज्यातील तब्बल 24 लाख जणांनी अशारितीने उपचार घेतले आहेत. केवळ 3 महिन्यांत 11 लाख लोकांनी ई-संजीवनीच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. अशारितीने या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून लोकांनी घरीच उपचार घेतले आहेत. ही सेवा मोफत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून दवाखान्यांवरील ताण कमी झाला आहे.
ई-संजीवनीची सेवा घेण्यात देशात आंधप्रदेश आघाडीवर असून 88 लाख 63 हजार जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. पश्चिम बंगाल 19 लाख 36 हजार, तामिळनाडू 17 लाख 68 हजार, उत्तरप्रदेश 15 लाख 74 हजार, आसाम 3 लाख 36 हजार, उत्तराखंड 3 लाख 25 हजार, केरळमध्ये 3 लाख 11 हजार लोकांनी या प्रणालीचा वापर करून लाभ घेतला आहे.
कोरोनाच्या लाटेत दवाखाने फुल्ल असल्याने कोविडसह इतर किरकोळ आजारी रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले होते. त्याकाळातही टेलिमेडिसीन उपचार पद्धती अनेकांना अतिशय लाभदायी ठरली आहे. या पद्धतीमुळे रुग्णांना दिलासा तर मिळालाच पण कोविडमुळे दवाखान्यात जाण्यास घाबरणाऱया रुग्णांना यातून दिलासा मिळाला आहे. सर्दी, ताप, खोकला असे सामान्य रुग्ण अशा पद्धतीचा वापर करून घरीच ठणठणीत बरे झाले आहेत. या पद्धतीचे उपचार घेण्यात काही कोरोना रुग्णही आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणाचे रुग्ण याचा अधिक वापर करत आहेत. दुसऱया लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अनेक जणांनी घरीच उपचार घेणे पसंद केले. त्यांना ही सेवा लाभदायी ठरली आहे.
टेलिमेडिसीन उपचार कसे घ्याल?
- मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरून गुगलवर जाऊन ई-संजीवनी ओपीडी असे टाईप करा.
- केंद्रीय आरोग्य खात्याचे मुख्य पान दिसेल. तिथे पेशंट रजिस्ट्रेशनवर जाऊन आपला मोबाईल नंबर नमूद करा. त्यावर सहा अंकी ओटीपी आल्यावर तो टाकल्यास रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन खुले होईल.
- व्हिडिओ कॉल संपर्कासाठी रुग्णाचे नाव, वय, स्त्री की पुरुष, स्थळ, मोबाईल नंबर नमूद करून लॉगईन करावे. त्यावेळी एक टोकन नंबर येईल. त्यानुसार तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.
- ही सेवा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते. एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.