नवी कीट अद्यापही उपलब्ध नाहीत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा विषाणू प्रयोगशाळेतील कोरोना टेस्टींग किटबाबतचा गोंधळ कायम असून नव्या कीट खरेदीसाठी रितसर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये आणखी काही दिवस जाणार आहे. घोषणा केल्याप्रमाणे नवी कीट उपलब्ध झालेली नसून आठ दिवस पुरेल एवढी कीट उपलब्ध असल्याचे समजते. मात्र हा साठा संपण्यापुर्वी टेंडर मंजुरी व खरेदी न झाल्यास कीटचा तुडवडा जाणवणार आहे.
जिह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. नवीन टेस्टिंग कीट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली होती. मात्र त्यानंतर प्रशासनाने दोन दिवसांत कीट उपलब्ध होतील अशी माहिती 3 जुलै रोजी दिली होती. कीट खरेदीसाठी 65 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुणे अथवा कोल्हापुरातून येणारी किट जिल्हा रूग्णालयाकडे उपलब्ध झाली नसल्याचे समजते.