सहा तासात गमावले 16 अब्ज डॉलर्स
कॅलिर्फोनिया
टेस्ला या कार निर्मिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या खासगी संपत्तीमध्ये मंगळवारी जवळपास 6 तासांमध्ये 16 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. सदरची स्थिती ही कंपनीच्या समभाग घसरणीमुळे झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
मस्क यांनी मंगळवारी जितकी संपत्ती गमावली आहे त्याची किमत टायटन, एचडीएफसी लाईफ आणि अल्ट्राटेक सिमेंट यासारख्या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीच्या बरोबरीइतकी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. एकाच दिवसात मंगळवारी शेअर बाजारात समभागात 21 टक्के इतकी विक्रमी घसरण झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे ऑटो निर्माती कंपनी निकोला कॉर्पचे समभाग 40 टक्के इतके वाढल्याचे समोर आले, त्याकरीता जनरल मोटर्सने 11 टक्के हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवल्याचे कारण सांगितले जाते.
संपत्तीमधील घसरणीसोबतच मस्क यांचे जगातील श्रीमंतांच्या यादीतले स्थानही घसरून ते ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार सहाव्या आणि फोर्ब्सच्या यादीत आठव्या क्रमांकावर आले आहे. ऑगस्टच्या अंतिमपर्यंत जेफ बेजोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर तिसऱया नंबरवर ते राहिले होते. सदरची एक दिवसाची घसरण ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येते.