वृत्तसंस्था/ बेलग्रेड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बेलग्रेड खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचला रशियाच्या कारात्सेव्हकडून पराभवाच्या धक्क्याला सामोरे जावे लागले.
या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात रशियाच्या 28 व्या मानांकित कारात्सेव्हने जोकोविचचा 7-5, 4-6, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या आठवडय़ात झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या इव्हान्सने जोकोविचला पराभव केले होते. बेलग्रेड स्पर्धेत रशियाच्या कारात्सेव्हने उपांत्य फेरीचा सामना जवळपास साडेतीन तासांच्या कालावधीत जिंकला. इटलीचा बेरेटेनी आणि जपानचा डॅनियल यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर कारात्सेव्हचा अंतिम फेरीतील सामना होईल.