10 जण जखमी – एकाची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानची राजधानी टोकियोमध्ये एका व्यक्तीने धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या पाठीवर आणि छातीवर चाकूने अनेकदा वार करण्यात आला होता. तर उर्वरित 9 जणांना किरकोळ ईजा झाली आहे.
चाकूने हल्ला करणाऱया व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 36 वर्षीय युसुक सुशिमा असे त्याचे नाव असून तो मानसिकदृष्टय़ा आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेतील आनंदी महिलांना पाहून संतापल्याचे तसेच महिलांना ठार मारू इच्छित होतो असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
सिजोगाकुएन स्थानकानजीक ही घटना घडली आहे. हल्ला झाल्यावर रेल्वेतील प्रवासी हादरून गेले होते. संबंधित डब्यातील लोक जोरजोरात ओरडत होते. तसेच एका डब्यातून दुसऱया डब्यात पळून जात होते अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.
आरोपीने केले होते पलायन रेल्वे आपत्कालीन बेक लावून थांबवावी लागले. चालक दलाने प्रवाशांना रेल्वेमार्गाद्वारे नजीकच्या स्थानकापर्यंत पोहोचविले. रेल्वे थांबल्यावर हल्लेखोराने ट्रकवर उडी मारून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला पकडले आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असताना अशाप्रकारची घटना घडल्याने जपानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जगात जपान सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो, तरीही मागील काही वर्षांमध्ये तेथे अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.