वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला आता जवळपास एक महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. या स्पर्धेसाठी विविध स्टेडियम्समध्ये स्पर्धा आयोजकांनी स्थानिक क्रीडा शौकिनांच्या उपस्थितीवर निर्बंध घातले आहे. आता या स्पर्धेच्या आयोजकांनी स्थानिक 10 हजार शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जपानमध्ये जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी विविध क्रीडाप्रकार सुसज्ज स्टेडियम्समध्ये घेतली आहे. या सर्व ऑलिंपिक स्टेडियम्समध्ये असलेल्या क्षमतेच्या 50 टक्के शौकिनांना आयोजकांनी परवानगी दिली आहे. अलिकडेच स्थानिक आयोजक, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक समिती, जपानचे शासन आणि टोकियो शहराच्या प्रशासन अधिकाऱयांची बैठक ऑनलाईनद्वारे घेण्यात आली. जपानचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारांनी सदर स्पर्धा प्रेक्षकविना घेण्याचा सल्ला जपानच्या शासनाला गेल्या आठवडय़ात दिला होता. कोरोना समस्येमुळे या स्पर्धेवर आता प्रतिबंधक नियमावलीचे बंधन घालण्यात आले आहे. 23 जुलैला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जपानच्या स्थानिक शौकिनांसाठी स्पर्धा आयोजकांनी 3.7 दशलक्ष तिकीटे उपलब्ध करून दिली आहेत. जपानच्या 6.5 टक्के जनतेचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत जपानमध्ये कोरोनाचे 14 हजार बळींची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.