वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीमुळे जुलै-ऑगस्ट 2020 दरम्यान होणारी टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही प्रतिष्ठेची स्पर्धा पुढीलवर्षी निश्चितपणे सुरळीत होईल, अशी आशा आयओसीचे सदस्य आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी व्यक्त केली आहे.
कोव्हिड-19 महामारीने संपूर्ण जगाला जबदरस्त धक्का दिला असून आतापर्यंत या महामारीत बळींच्या संख्येने लाखाची मर्यादा ओलांडली असून किमान 20 लाख लोकांना याची बाधा झाली आहे. या महामारीवर लस (व्हॅक्सिन) लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मत जगातील काही तज्ञ शास्त्रज्ञ आणि डॉक्टारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढीलवर्षी होईल याची हमी सध्या तरी देता येणार नाही. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरस प्रसाराची स्थिती नियंत्रणाखाली होणे जरूरीचे आहे. कोरोना जपानमध्ये नियंत्रणाखाली असला तरी संपूर्ण जगामध्ये या महामारीचे स्वरूप सौम्य होणे आवश्यक आहे. तथापि चालू वर्षांअखेरीस कोरोना महामारीचे संकट संपुष्टात येईल आणि 2021 जुलैमध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धा सुरळीतपणे पार पडेल, अशी आशा नरेंद्र बात्रा यांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सहकार्य आयोगाबरोबर टोकियो ऑलिंपिक स्पर्धा आयोजकांची अलिकडे चर्चा झाली. या चर्चेवेळी कोव्हिड-19 व्हॅक्सिन उपलब्ध झाल्यास टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढीलवर्षी घेतली जाईल या मताशी ऑस्ट्रेलियाचे जॉन कोटस् यांनी सहमत नसल्याचे सांगितले. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने ऑनलाईनद्वारे घेतलेल्या खास बैठकीमध्ये बात्रा यांनी आपले वरील मत व्यक्त केले. 2016 साली बात्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती तर गेल्यावर्षीच्या जूनमध्ये त्यांची आयओसी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाची मुदत पुढील वर्षांच्या जूनपर्यंत राहील.