वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱया भारताच्या पाच स्टार खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिवंगत बॉक्सर डिंको सिंगच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल तसेच गोलरक्षक सविता पुनिया, पॅराऑलिंपिकमधील पदक विजेते मरीयप्पन थंगवेलू आणि शरद कुमार त्याचप्रमाणे पुरूषांच्या हॉकीमध्ये कास्यपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघाचे साहाय्यक प्रशिक्षक पीयूष दुबे यांना भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे (साई) बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या येथे झालेल्या 55 व्या नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. त्याचप्रमाणे आशियाई सुवर्णपदक विजेता तसेच अर्जुन पुरस्कार विजेता भारताचा मुष्टीयोद्धा दिवंगत ंिडंको सिंग याच्या कुटुंबियासाठी साईतर्फे 6.87 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या जून महिन्यात डिंको सिंगचे वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले होते. भारतीय क्रीडाक्षेत्रामध्ये डिंको सिंगचे योगदान महत्त्वाचे असल्याने साईतर्फे त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सविताला साहाय्यक प्रशिक्षकपदावरून प्रशिक्षकपदी तसेच राणी आणि दुबे यांना वरिष्ठ प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या हॉकीमध्ये भारतीय संघाने चौथे स्थान मिळविले होते. या संघामध्ये राणी आणि सविता यांचा समावेश होता. टोकियोमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत पुरूषांच्या उंचउडी प्रकारात पदक मिळविणाऱया मरीयप्पनला प्रमुख प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्याने सलग दुसऱयांदा पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून दिले. मरीयप्पनला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन कणाऱया शरद कुमारला प्रशिक्षक म्हणून बढती मिळाली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या कार्यकारी नियंत्रण समितीच्या झालेल्या 55 व्या बैठकीमध्ये टोकियो ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करणाऱया प्रशिक्षकांचा खास गौरव करून त्यांना बढती देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. साईच्या या निर्णयाचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी खास कौतुक केले आहे.