सांगता सोहळय़ात शानदार पथसंचलन, उत्सवी वातावरणाची झलक, पुढील ऑलिम्पिक पॅरिसमध्ये
टोकियो / वृत्तसंस्था
कोरोनाचे अस्मानी संकट, वर्षभर उशिराने आयोजन, स्थानिकांचा विरोध, विविध निदर्शने अशा कित्येक अडथळय़ांवर मात करणाऱया टोकियो ऑलिम्पिकची रविवारी यशस्वी सांगता झाली. फटाक्यांची आतषबाजी, लक्षवेधी रोषणाई, गीत-संगीताचा नजराणा अशा उत्सवी वातावरणात शानदार सांगता सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकची सांगता झाल्याचे यावेळी जाहीर केले.
यंदा ऑलिम्पिक 2021 च्या मध्यात झाली असली तरी टोकियो ऑलिम्पिक 2020 हे स्पर्धेचे नाव कायम ठेवले गेले. स्पर्धेतील जवळपास सर्व इव्हेंट्स रिकाम्या स्टॅण्डसमोर झाले. अर्थात, यानंतरही आयोजकांचा जोश कमी झाला नव्हता.
‘वर्ल्ड्स वुई शेअर’ हा संदेश या सांगता सोहळय़ाच्या माध्यमातून दिला गेला. जवळपास 2 आठवडे ऍथलिट्ससाठी तणावाच्या स्थितीतील इव्हेंट्स पार पडले आणि त्यानंतर रविवारी बाईक स्टंट्स लाईट शोच्या माध्यमातून उत्सवी वातावरणाची झलक दाखवली गेली.
टोकियो ऑलिम्पिक सुरु असतानाच जपानमध्ये कोरोनाने आणखी उग्र स्वरुप धारण केले. अगदी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. पण, यानंतरही विविध निर्बंध लादत, उपाययोजनांवर भर देत आयोजकांनी यातून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कोरोनामुळेच ऍथलिट्सना मास्क घालून वावरावे लागले. फक्त पोडियमवर पदक स्वीकारल्यानंतरच 30 सेकंद मास्क काढण्याची मुभा होती. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य हा मुद्दा सिमोन बाईल्सच्या माघारीमुळे चर्चेत आला.
जपानसाठी यंदाचे हे चौथे ऑलिम्पिक होते. सर्व इव्हेंट्सची सांगता झाल्यानंतर रविवारी सांगता सोहळय़ात सहभागी संघांच्या छोटय़ा पथकांनी पथसंचलन केले आणि घरी बसून सांगता सोहळय़ात सहभागी होणाऱया चाहत्यांचे व्हीडिओ झूम कॉल स्क्रीनवर शेअर केले गेले. सर्व ऍथलिट्सना आपले इव्हेंट्स पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत मायदेशी रवाना होण्याची सूचना असल्याने केवळ शेवटच्या टप्प्यात ज्यांचे इव्हेंट्स होते, असेच ऍथलिट उपस्थित होते.
टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी ऑलिम्पिक ध्वज थॉमस बाक यांच्याकडे सोपवला तर बाक यांनी हा ध्वज पुढे 2024 ऑलिम्पिकचे यजमान, पॅरिसचे मेयर ऍने हिडॅल्गो यांच्याकडे सुपूर्द केला.
बॉक्स
चीनला पहिले सुवर्ण तर सर्बियाला शेवटचे सुवर्ण
यंदा टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण चीनने जिंकले. दि. 24 जुलै रोजी चीनच्या यांग क्वियानने 10 मीटर्स एअर रायफल गटात अव्वल पदकाची कमाई केली. त्यानंतर सर्बियाने रविवारी दुपारी झालेल्या शेवटच्या इव्हेंटमध्ये पुरुषांच्या वॉटर पोलोचे सुवर्ण जिंकले. अंतिम फेरीत त्यांनी ग्रीसला पराभूत केले.
बॉक्स
पदकतालिकेत अमेरिका टॉप, भारताला 48 वे स्थान
अमेरिकेने पदकतालिकेत 39 सुवर्णपदकांसह एकूण 113 पदके संपादन केली आणि अव्वलस्थान संपादन केले. चीनने 88 पदकांसह दुसरे स्थान मिळवले. यात 38 सुवर्णपदकांचा समावेश राहिला. यजमान जपानने 58 पदकांसह तिसरे स्थान संपादन केले. त्यांनी या ऑलिम्पिकमध्ये 27 सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवली.
बॉक्स
भारत ऑलिम्पिकमध्ये प्रथमच पहिल्या 50 देशात
यंदा 1 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 7 सर्वोच्च पदके जिंकणाऱया भारतीय पथकाने पदकतालिकेत 48 वे स्थान संपादन केले. ऑलिम्पिक पदकतालिकेत भारताने पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 2 पदके (1 रौप्य, 1 कांस्य) जिंकणारा भारतीय संघ 67 व्या स्थानी राहिला होता.