वृत्तसंस्था/ टोकियो
कोरोना महामारेमुळे 2020 सालातील होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता ही स्पर्धा 2021 च्या जुलैमध्ये घेतली जाणार आहे. कोरोनाचे संकट अद्याप सुरू असल्याने या स्पर्धेवर साशंकतेचे सावट निर्माण झाले असले तरी ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्धार जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्यक्त केला आहे.
सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुन्हा रद्द केली जाईल, अशी चर्चा क्रीडा क्षेत्रामध्ये सुरू आहे. जपानमध्ये पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याने या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, सदर स्पर्धा 2021 च्या जुलै महिन्यात घेण्याचा निर्धार जपानचे पंतप्रधान सुगा यांनी केला आहे. यासंदर्भात आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी पंतप्रधान सुगा यांनी चर्चा केली आहे. टोकियोमध्ये विश्व इकॉनॉमिक फोरमची बैठक झाली. या बैठकीमध्ये बाक आणि पंतप्रधान सुगा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही दिली.