देवेंद्र झाझरिया तिसऱ्या पॅरालिम्पिक्स सुवर्णपदकासाठी सज्ज, पथकात 54 सदस्यांचा समावेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी टोकियो पॅरालिम्पिक्ससाठी 54 सदस्यीय भारतीय पथक गुरुवारी जपानला रवाना झाले. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर व राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दि. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत यंदाची पॅरालिम्पिक चालणार आहे.
एफ-46 भालाफेक इव्हेंटमध्ये यंदा देवेंद्र झाझरिया तिसऱया वैयक्तिक पॅरालिम्पिक सुवर्णपदकासाठी निर्धाराने रिंगणात उतरेल. यापूर्वी 2004 व 2016 पॅरालिम्पिकमध्ये त्याने 2 सुवर्ण जिंकले आहेत. याशिवाय, मरियप्पन थांगवेलू (टी-63 उंच उडी) व वर्ल्ड चॅम्पियन संदीप चौधरी (एफ-64 भालाफेक) पदकाचे प्रबळ दावेदार आहेत. भारतीय पॅरालिम्पियन एकूण 9 क्रीडा प्रकारात सहभागी होतील. रिओ पॅरालिम्पिक्समधील सुवर्णजेता मरियप्पन हा 24 ऑगस्ट रोजी होणाऱया उद्घाटन सोहळय़ात भारतीय पथकाचा ध्वजवाहक असेल.
‘आपले सर्व पॅरा ऍथलिट्स महत्त्वाकांक्षी आहेत. शिवाय, त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे धैर्य, धाडस यासमोर बडी आव्हानेही नतमस्तक असतील’, असे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर व्हीडिओ संदेशातून म्हणाले. शेवटच्या पॅरालिम्पिक्स आवृत्तीच्या तुलनेत यंदा सहभागी होणाऱया आपल्या पॅरा ऍथलिट्सची संख्या तिपटीने अधिक आहे, याचा देखील त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ऍथलिट्सना, पॅराऍथलिट्सना सातत्याने प्रेरणा दिली असून ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला भरघोस यश प्राप्त होईल, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
पॅरालिम्पिक्स कमिटीचे सचिव गुरशरण सिंग या स्पर्धेसाठी भारतीय पथकाचे प्रमुख असणार आहेत. यंदा पॅरालिम्पिक्स गेम्समध्ये बॅडमिंटनचे पदार्पण होत असून भारताने यासाठी 7 शटलर्स उतरवले आहेत. या पॅरालिम्पिक्सचे युरो स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्सवरुन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारताची मोहीम दि. 27 ऑगस्ट रोजी सुरु होईल.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर
परंपरेप्रमाणे दि. 29 ऑगस्ट रोजी ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी होणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा लांबणीवर टाकला गेला आहे. पॅरालिम्पिक्समधील कामगिरीचा विचार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर म्हणाले. पॅरालिम्पिक्स दि. 5 सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यानंतरच निवड समिती शिफारस करेल, असे चित्र यामुळे स्पष्ट आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन स्वरुपातच होणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे.