टेबल टेनिस, पॉवरलिफ्टींग, तायक्वांदो प्रकारात भारताला पदकांची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला मंगळवार 24 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. टेबल टेनिस, पॉवरलिफ्टींग, तायक्वांदो या क्रीडा प्रकारामध्ये भारताला पदकांची अधिक अपेक्षा आहे. गुजरातच्या भविना पटेल आणि सोनलबेन पटेल टेबल टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करतील. दरम्यान एफ 52 पुरूषांच्या थाळीफेकमध्ये भारताच्या विनोदकुमारला पदक मिळण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडाप्रकारात भविना पटेल व्हीलचेअर क्लास-4 गटात तर सोनलबेन पटेल व्हीलचेअर क्लास-3 गटात महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. त्याचप्रमाणे महिलांच्या दुहेरीतही पटेल आणि सोनलबेन खेळणार आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच भविना आणि सोनलबेन यांच्या मोहिमेला पात्रता फेरीपासून प्रारंभ होईल. टेबल टेनिस हा क्रीडाप्रकार 25, 26, 27 ऑगस्ट रोजी होणार असून उपांत्य आणि अंतिम फेरी 28 आणि 29 ऑगस्टला खेळविली जाईल. भविना सध्या जागतिक मानांकनात आठव्या तर सोनलबेन 19 व्या स्थानावर आहे. भारताच्या या महिला टेबल टेनिसपटूंनी आशियाई क्रीडास्पर्धेत पदके मिळविली असून त्यांना अहमदाबादमध्ये लालन दोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
पॅरातायक्वांदो या क्रीडाप्रकारात 21 वर्षीय अरूणा तन्वर ही एकमेव ऍथलीट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. हरियाणाची तन्वर अंडर 49 किलो के 44 विभागात भाग घेणार असून तिच्या क्रीडाप्रकाराला 2 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. के 44 कॅटेगरीच्या जागतिक मानांकनात अरूणा तन्वर 30 व्या स्थानावर असून तिने 2018 साली व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई पॅरातायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तसेच 2019 साली तुर्कीमध्ये झालेल्या विश्व पॅरातायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते.
पॅरापॉवरलिफ्टींग या क्रीडाप्रकारात भारताचे जय दीप, सकिना खातुन भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या सकिनाला बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये प्रशिक्षण सुविधाची सोय करण्यात आली होती. हरियाणाच्या जय दीपला रोहटकच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये सरावाची सोय करण्यात आली होती. सकिना ही महिलांच्या 50 किलो वजनगटामध्ये भाग घेणार आहे. सकिनाने 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक तर 2018 च्या पॅराआशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तिला लहानपणी पोलिओ झाला होता. त्यानंतर तिला 2010 मध्ये दिलीप मजुमदार व तिचे विद्यमान प्रशिक्षक फरमान बाशा यांच्याकडून आर्थिक साहय़ मिळाले होते. सकिना आणि जय दीप यांच्या क्रीडाप्रकाराला टोकियोमध्ये 27 ऑगस्टला प्रारंभ होईल. जय दीप पुरुषांच्या 65 किलो वजन गटात सहभागी होणार असून तो भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे साहायक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत आहे.
विनोद कुमारला एफ 52 कॅटेगरी
भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारचा रविवारी एफ 52 कॅटेगरीत समावेश केल्याने या क्रीडाप्रकारात पदक मिळण्याची आशा बळावली आहे. भारताचा भालाफेक ऍथलीट तेकचंद याचे पुनर्वर्गीकरण करण्यात आले असून त्याला एफ-55 कॅटेगरीमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याआधी त्याला एफ 54 मध्ये स्थान देण्यात आले होते. पॅराऍथलेटिक्सचे अध्यक्ष सत्यनारायण यांनी कुमारच्या वर्गवारीबद्दल आनंद व्यक्त करीत ते अपेक्षितच असल्याचे म्हणाले. ‘विनोदच्या स्वतःच्याच कॅटेगरीत त्याला पुन्हा स्थान मिळाले, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामुळे या प्रकारात पदक मिळण्याच्या भारताच्या आशेला आणखी बळकटी मिळाली आहे,’ असे ते म्हणाले. ‘तेकचंदला मात्र वरची कॅटेगरी मिळाली असल्याने त्याला कठोर स्पर्धेला सामोरे जावे लागेल. मात्र तो सर्वोत्तम कामगिरी करणार, याची आम्हाला खात्री वाटते,’ असा विश्वासही सत्यनारायण यांनी व्यक्त केला. पॅराऍथलेट्सच्या दिव्यांगतचे स्वरूप व प्रकार पाहून त्यांची वर्गवारी करण्यात येते. यामुळे समान दिव्यांगता असलेल्या खेळाडूंमध्येच त्यांना खेळण्याची संधी मिळते. इंग्रजी अक्षर व क्रमांक या संज्ञा देत त्यांची वर्गवारी करण्यात येते ट्रक, मॅरेथॉन शर्यत किंवा उडी मारण्याच्या प्रकारात टी, फील्ड इव्हेंट असेल तर एफ अशी संज्ञा क्रमांकासह देण्यात येते.