वृत्तसंस्था/ टोकियो
24 ऑगस्टपासून येथे टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. कोरोना समस्येमुळे सदर स्पर्धा प्रेक्षकांविना राहील, अशी घोषणा शुक्रवारी स्पर्धा आयोजकांनी केली आहे.
जपानमध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेचे अनेक शहरांत असंख्य रुग्ण आढळत आहेत. टोकियोमध्ये सध्या आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील विविध क्रीडाप्रकार मध्य जपानमधील शिझूओका शहरामध्ये घेतली जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेवेळी काही क्रीडा प्रकारांना मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली जाईल, असे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. स्पर्धा आयोजकांनी या पॅरा ऑलिम्पिकसाठी सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्याचे निश्चित केले होते. पण कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठीची ही योजना रद्द केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण, टेबल टेनिस, व्हिलचेअर, समशेरबाजी, बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश असून विविध देशांचे सुमारे चार हजार ऍथलिट्स यामध्ये भाग घेत आहेत.