वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील नगरोटाजवळ शुक्रवारी सुरक्षा दलांनी मारलेल्या दहशतवाद्यांना नेणाऱया ट्रकचा चालक हा पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंह यांनी ही माहिती दिली आहे. तर मारलेले दहशतवादी हे जैश ए महमद या संघटनेचे होते.
शुक्रवारी नगरोटाजवळील एका टोलनाक्यावर सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. त्यानंतर त्या दहशतवाद्यांना नेणाऱया ट्रकसह चालकाला ताब्यात घेण्यात आले होते. या चालकाकडे चौकशी केल्यानंतर हा खुलासा समोर आला आहे. गेल्यावर्षी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. दिलबागसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जेईएमचे हे दहशतवादी कठुआ जिल्हय़ातून जम्मूमध्ये घुसले होते. एका ट्रकमधून ते काश्मीर खोऱयाकडे निघाले होते. तेव्हा जम्मू श्रीनगर मार्गावर ही चकमक उडाली. जवानांनी दहशतवाद्यांना ठार मारले. तर एका दहशतवाद्याचा शोध सुरु आहे.
सिंह म्हणाले, ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालकाचा कसून तपास घेतला असता तो पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तोही पुलवामा येथील असून समीर डार असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ मंजूर डार हा 2016 मध्ये मारला गेला होता. तर अदिल डार याचाही तो नातेवाईक आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुलवामाजवळ त्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळवली होती.
समीर डार याने त्या तीन दहशतवाद्यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर कठुआ जिल्हय़ातून हीरानगर सेक्टरजवळ दयालचक भागात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर ट्रकमध्ये घेतले होते. जम्मूपासून 28 किलोमीटरवर बन्न टोलप्लाझाजवळ उडालेल्या चकमकीत या तिघांना मारल्यानंतर ट्रक, स्नायपर रायफल्स, मोठय़ा प्रमाणात दारुगोळा जप्त केल्याचेही दिलबागसिंह यांनी सांगितले.