50 हजार ट्रकचालकांनी निवासस्थानाला घेरले : कोरोना लसीकरण सक्तीला विरोध
वृत्तसंस्था / टोरंटो
कॅनडात कोरोना लसीकरणाच्या विरोधातील निदर्शने आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचली आहेत. राजधानी ओटावामध्ये निदर्शक ट्रकचालकांनी ट्रूडो यांच्या घराला घेराव घातला आहे. परंतु या घेरावापूर्वीच पंतप्रधान कुटुंबासह घर सोडून गुप्त ठिकाणी गेले आहेत. ‘फ्रीडम कॉनवॉय’ नावाने सुरू असलेली ही निदर्शने देशात कोरोना लसीकरण अनिवार्य करणे आणि लॉकडाऊन लागू करण्याच्या विरोधात होत आहेत.
हजारो ट्रकचालक आणि निदर्शक शनिवारी राजधानी ओटावामध्ये एकत्र आले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला 50 हजार ट्रकचालकांनी 20 हजार ट्रकांसोबत चहुबाजूने घेरले आहे. लसीकरणाचा आदेश आणि अन्य आरोग्य निर्बंध मागे घेतले जावेत अशी त्यांची मागणी आहे. निदर्शक स्वतःसोबत मुले, वृद्ध आणि दिव्यांग लोकांना घेऊन पोहोचले आहेत. या निदर्शकांनी पंतप्रधानांबद्दल अश्लाघ्य टिप्पणी देखील केली आहे.
सैन्य अधिकाऱयांकडून निंदा
काही निदर्शकांना नॅशनल वॉर मेमोरियलवर नाचताना पाहिले गेले. या निदर्शकांची कॅनडाचे वरिष्ठ सैन्य जनरल वेन आइरे आणि कॅनडाच्या संरक्षणमंत्री अनिता आनंद यांनी निंदा केली आहे. कडाक्याच्या थंडीच्या इशाऱयानंतरही शेकडो निदर्शक संसद परिसरात घुसल्यानंतर संभाव्य हिंसेवरून पोलीस सतर्क आहेत. लसीकरण अनिवार्य करण्यापूर्वी पंतप्रधान ट्रुडो यांनी ट्रकचालक केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशाच्या उर्वरित लोकांसाठी धोका ठरल्याचे विधान केले होते.
फ्रीडम कॉनवॉय
पूर्ण कॅनडामधून सुमारे एक आठवडय़ाचा दीर्घ प्रवास केल्यावर हे ट्रक राजधानी ओटावामध्ये पोहोचले आहेत. हे आंदोलन शांततेत होईल असे आयोजक म्हणत असले तरीही मोठय़ा गर्दीसमोर हतबल दिसून येत असलेल्या पोलिसांनी या संकटासाठी आपण तयार नसल्याचे म्हटले आहे. ट्रकांच्या या ताफ्याला ‘फ्रीडम कॉनवॉय’ नाव देण्यात आले आहे. कॅनडा सीमेवर कोरोना लसीकरण ट्रूडो सरकारने अनिवार्य केले आहे. नव्या आदेशामुळे लसीकरण न केलेल्या चालकांनी अमेरिकेतून परतल्यावर कॅनडात क्वारेंटाइन व्हावे लागत आहे.
पोलीस हायअलर्ट
ट्रकचालक हॉर्न वाजवून जस्टिन ट्रुडो यांना विरोध करत आहेत. त्यांच्या हातात आणि ट्रकवर कॅनडाचा झेंडा आहे. लसीकरणाच्या नियमांना विरोध करणाऱयांमध्ये मुले देखील सामील आहेत. हे निदर्शक प्रवासात नाचत आणि नारेबाजी करत ओटावाच्या दिशेने येत आहेत. हिंसेची भीती पाहता पोलीस हाय अलर्टवर आहेत. मोठय़ा संख्येत निदर्शक संसदेनजीक एकत्र झाले आहेत.