निदर्शकांची खाती गोठविणार सरकार : पंतप्रधान ट्रुडोंनी लागू केला आणीबाणी कायदा
@ वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाच्या सरकारने लसीकरण अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ट्रकचालक निदर्शने करत आहेत. हे पाहता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निदर्शकांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वीच आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. तसेच निदर्शकांची बँक खाती गोठविणार असल्याचे म्हटले आहे. कॅनडात 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आणीबाणी कायदा लागू करण्यात आला आहे.
सरकारने उचललेल्या पावलांची कक्षा मर्यादित वेळेपुरती, योग्य असेल. आणीबाणीदरम्यान सैन्य तैनात करण्या येणार नाही. परंतु अधिकाऱयांना निदर्शकांना अटक करण्यासाठी आणि त्यांचे ट्रक जप्त करण्यासाठी वाढीव अधिकार देण्यात येतील. तसेच निदर्शनांना वित्तसहाय्यावर बंदी घातली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशाशिवाय बँका निदर्शकांची वैयक्तिक खातीही गोठवू शकतील असे ट्रुडो म्हणाले.
कॅनडाच्या लोकांना सुरक्षित ठेवणे, लोकांच्या नोकऱयांच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांना निदर्शकांना कैद करणे किंवा त्यांना दंड ठोठावण्याचा तसेच महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे रक्ष करण्यासाठी अधिक उपकरणे दिली जातील. कायदा तात्पुरत्या स्वरुपात आणि अत्यंत विशिष्ट पद्धतीने लागू केला जाणार आहे. ही आणीबाणी संघीय सरकारला पुढील 30 दिवसांपर्यंत ‘विशेष तात्पुरत्या उपाययोजना’ लागू करण्याचा अधिकार देणार असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे.
वाहनविमा होणार निलंबित
न्यायालयाच्या आदेशाशिवाय बँका कुठल्याही व्यक्तीचे खाते गोठवू शकणार आहेत. निदर्शनात सामील कुठल्याही व्यक्तीचा वाहनविमाही निलंबित केला जाऊ शकतो असे विधान उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांनी केले आहे.
निदर्शनांमागील कारण
अमेरिका-कॅनडा सीमेवर ट्रकचालकांना कोरोन लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच लसीकरण झाले असेल तरच सीमा ओलांडून कॅनडात प्रवेश करता येणार आहे. कॅनडाचे ट्रकचालक या निर्णयाला विरोध करत असून हजारो ट्रकचालकांनी ‘फ्रीडम कॉन्वॉय’ नावाने निदर्शने चालविली आहेत.