वाहनचालकांमध्ये खळबळ :अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा
प्रतिनिधी/ खंडाळा
पारगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत ट्रकमधून अज्ञात चोरटय़ांनी 18 लाख रुपयांच्या किंमतीची वेलची लंपास केल्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अज्ञात चोरटय़ांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी 3.30 ते 8 सप्टेंबर 2020 रोजी 8.42 वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय माहामार्गावर चहाच्या टपरी लगत नागेश पुट्टे गवडा (वय 45, रा. यशवंतपुर, बेंगलोर हा ट्रकचालक ट्रक क्रमांक (एम.एच 48 बीएम.5979) घेवून जात होता.
खंबाटकी बोगदा पार करुन ट्रक चहाच्या टपरीजवळ थांबवला असता ट्रकच्या मागील दरवाजाचे लॉक तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली तर त्यातील वेलचीचा माल गायब होता. त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेवून बेंगलोर ते खंडाळा दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी ट्रकच्या मागील दरवाज्याचे लॉक तोडून 18 लाख रुपये किंमतीच वेलची लंपास केल्याची तक्रार दिली. दरम्यान, या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल झाला आहे.