प्रतिनिधी/गडहिंग्लज
चिंचेवाडी येथे वनविभागाने तोडलेली लाकडे नेण्यासाठी आलेला ट्रॅक्टर व डंपींग ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात प्रदीप बाळकृष्ण पाटील (वय. 21 रा. कोळिंद्रे, ता. आजरा) हा युवक ठार झाला. शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात घडला. याची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.
भानुदास विष्णू पाटील व प्रदीप पाटील हे दोघे कोळीद्रे येथून वनविभागाने तोडलेली लाकडे वाहतूक करण्यासाठी डंपींग ट्रॉलीसह ट्रक्टर घेऊन सामानगड पायथ्याशी असणाऱया चिंचेवाडीला आले होते. चिंचेवाडी येथे उताराला भानुदास पाटील हा ट्रक्टर लावून गेला होता. या ट्रक्टरच्या बाजुलाच प्रदीप उभा होता. ट्रक्टर व ट्रॉली अचानक पलटी होऊन प्रदीप त्याच्याखाली सापडला. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने नाका, तोंडातून रक्त येवून तो जागीच ठार झाला. याची फिर्याद विठ्ठल केरबा पाटील (रा. कोळींद्रे) यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली असून भानुदास पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर हे करत आहेत. प्रदीप हा अविवाहीत असून एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. कर्ता मुलगा अपघातात मयत झाल्याने बाळकृष्ण पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.