राकुसलेवाडीतील घटना : मुलगी खेळत असताना ट्रक्टरने दिली धडक
प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी येथे गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ट्रक्टरने एका सहा वर्षीय मुलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अक्षरा जगन्नाथ मोरे (वय 6, रा. राकुसलेवाडी) असे या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत रुग्णालयीन पोलीस चौकीतून दिलेल्या माहितीनुसार राकुसलेवाडीत गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अक्षरा मोरे ही मुलगी खेळत असताना रस्त्याने जात असलेल्या ट्रक्टरची धडक तिला बसली. यामध्ये ती जखमी झाली. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी गाडीतून तातडीने उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याबाबत वैद्यकीय सुत्रांनी माहिती दिल्यानंतर तिच्या सोबत आलेल्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या मृत्यूची बाब कळल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या अपघाताची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.