बेळगाव : ट्रक्टरवरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सदर घटना बेळगाव-बागलकोट रोडवरील शिंदोळी क्रॉस येथे शुक्रवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली. रोहित भावकाण्णा सुणगार (वय 10 रा. निलजी) असे मुलाचे नाव आहे.
शेतात मळणी करून भात विक्रीसाठी निलजीहून कुडचीकडे ट्रक्टरमधून नेण्यात येत होते. त्यावेळी रोहित हा ट्रक्टर इंजिन व ट्रॉलीच्या मध्यभागी असलेल्या रॉडवर बसला होता. शिंदोळी क्रॉसजवळ गतिरोधकावर ट्रक्टर येताच रोहित खाली कोसळला. ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलकडे नेताना वाटेतच मृत्यू झाला. उत्तर रहदारी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. रोहितवर शनिवारी सकाळी 10 वा. निलजी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहितच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.