उमराणीनजीक अपघात : दोघेजण गंभीर : मृत चिकोडी, नागरमुन्नोळीतील
प्रतिनिधी/ चिकोडी
उमराणी गावानजीक निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर उसाने भरलेला ट्रक्टर व क्रूझर यांच्यात रविवारी मध्यरात्री समोरासमोर धडक झाल्याने प्रुझरमधील दोघे जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात कुशाप्पा कांबळे (वय 52 रा. चिकोडी) व संतोष बागेवाडी (वय 33 रा. नागरमुन्नोळी) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, नागरमुन्नोळीकडून ऊस भरुन चिकोडीकडे येत असलेल्या ट्रक्टर क्र. के. ए. 23 टी. बी. 1070 व चिकोडीहून नागरमुन्नोळीकडे जात असलेल्या प्रुझर क्र. के. ए. ए 4992 या दोन्ही वाहनांची उमराणी नजीक निपाणी-मुधोळ रस्त्यावर बिरेश्वर मंदिराजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रुझरमधील दोघे जागीच ठार झाले. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील कुशाप्पा कांबळे या मृताचा मुलगा लक्ष्मीकांत कुशाप्पा कांबळे (वय 27 हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नागरमुन्नोळी येथील विशाल कांबळे (वय 21) हाही जखमी झाला असून त्याच्यावर सार्वजनिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. मृत कुशाप्पा कांबळे हे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सरकारी प्रवासी मंदिरात शिपाई म्हणून कार्यरत होते. चिकोडी येथे आलेल्या मित्राला नागरमुन्नोळी येथे सोडून येण्यासाठी हे प्रुझरने जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी चिकोडी रहदारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के. एस. कोचरी व सहकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.