प्रतिनिधी / कराड :
ट्रक्टर ट्रॉलीला पाठिमागून भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात तीन जण झाल्याची घटना खोडशी (ता. कराड) येथे बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली. मृतांत आयशर टेम्पोचालक व ट्रॉलीतील दोन ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोच्या धडकेनंतर ट्रॉलीत बसलेले चौघेजण रस्त्यावर आपटले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुटाप्पा जयाप्पा बेकनशेट्टी (वय 25 रा. आगलवाडीता, रायगाव जि. बेळगाव), नामदेव किसन साखरे (वय 40 रा. तांदळवाडी, ता. धरूर, जि. बीड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कृष्णात महादेव काळे (वय 28) यांचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. शांताराम अच्युतराव चव्हाण (वय 35 रा.), सौ. राजमती विष्णू काळे (वय 25), ताई विष्णू काळे (वय 4 सर्व रा. सरफराजपूर ता. परळी जि. बीड) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऊसतोड कामगारांना घेऊन ट्रक्टर पुणे बाजूकडे निघाला होता. ट्रक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत पाठिमागे पुरूष व महिला असे दहाजण व चार लहान मुले बसली होती. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ट्रक्टर खोडशी गावच्या हद्दीत आल्यावर पाठिमागून भरधाव वेगाने येणाऱया आयशर टेम्पोने ट्रक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक एवढी भीषण होती की ट्रक्टरमधील पाचजण रस्त्यावर आपटले गेले. आयशर टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याने चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे टेम्पो चालक जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॉलीतील ऊसतोड कामगारही गंभीर जखमी होऊन मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या कृष्णत काळे यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा गुरूवारी सायंकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
झापड आल्याने अपघात
भरधाव आयशर टेम्पोने ट्रक्टरला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. आयशर टेम्पोचालकाच्या डोळय़ावर झापड आल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ट्रक्टरमधून होणारा धोकादायक प्रवासही अपघाताने चर्चेत आला आहे.