स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांची कोल्हापुरात कारवाई दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडी
फोंडाघाट येथील पेट्रोल पंपावरून ट्रकची झाली होती चोरी
एक आरोपी सराईत गुन्हेगार
कणकवली:
फोंडाघाट येथील पोकळे पेट्रोल पंप येथे उभा केलेला ट्रक घेऊन पलायन केल्यानंतर तब्बल महिनाभर पसार असलेल्या विशाल बाबूराव घस्ते (38) व संतोष उर्फ आदित्यकुमार रामजी सिंग (22, दोन्ही रा. तामगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या दोन्ही आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री आवळल्या. एलसीबीने दोघांनाही तामगाव येथूनच ताब्यात घेतले. दरम्यान, कणकवली पोलिसांनी बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले. असता, न्या. एस. एम. जमादार यांनी दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे ऍड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
आरोपींपैकी विशाल घस्ते हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आतापर्यंत कोल्हापूर, शहर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, इस्लामपूर, पिंपरी-चिंचवड, सांगोला- सोलापूर, निपाणी अशा विविध ठिकाणी मिळून 25 पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे केले आहेत. त्याला यापूर्वी चोरीच्याच गुन्हय़ांखाली कर्नाटक येथे आठ महिन्यांची शिक्षाही झाली आहे. तसेच 2011 ते 2014 या कालावधीतील बराच काळ तो जेलमध्येच होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पेट्रोल पंपावरून चोरला होता ट्रक
ही चोरीची घटना 28 जानेवारीच्या रात्री घडली होती. प्रमोद शामराव झेंडे (38, रा. सांगली) यांनी रिकामा ट्रक (एमएच 09 सीव्ही 2094) फोंडाघाट येथील पोकळे पेट्रोल पंप येथे उभा केला होता. रात्री दोनच्या सुमारास ट्रक जागेवरच होता. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास प्रमोद यांनी पाहिले असता, ट्रक जागेवर नव्हता. ट्रक चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने प्रमोद यांनी पोलिसांत धाव घेऊन तशी फिर्याद दिली होती. दरम्यान, कणकवली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात आरोपी विशाल व संतोष हेच ट्रक उभा असलेल्या परिसरात घुटमळताना दिसले होते.
…अन् एलसीबीची शोधमोहीम झाली सुरू
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला आणखीन एक माहिती प्राप्त झाली. कुडाळ येथे साधारण चार महिन्यांपूर्वी बोलेरो गाडी चोरीस गेली होती. त्याप्रकरणी दोन आरोपीही अटक झाले होते. मात्र, तिसरा आरोपी फरार होता. हा आरोपी विशाल घस्ते हाच होता व एलसीबीचे पोलीस त्याच्या शोधात होते. तर फोंडाघाट येथील ट्रक चोरीतही विशालचाच हात असल्याचे समजल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
दोघांच्याही मुसक्या आवळल्या
पोलिसांनी गुप्त माहितगारांतर्फे माहिती घेतली. विशाल हा अट्टल चोरटा आहे. अर्थातच तो कोल्हापूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तेथील पोलिसांकडूनही त्याची अधिकची माहिती मिळाली. अखेर विशाल हा आपल्या तामगाव (ता. करवीर) येथील गावी असल्याचे समजल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तेथे धाव घेतली. मंगळवारी रात्री विशालसह त्याचा साथीदार संतोष उर्फ आदित्यकुमार अशा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एलसीबीच्या पथकामध्ये उपनिरीक्षक सचिन शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, कॉन्स्टेबल रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, संकेत खाडये आदींच्या पथकाचा समावेश होता.
आरोपींना पोलीस कोठडी
अटकेतील दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षातर्फे ऍड. गजानन तोडकरी यांनी आरोपी विशाल घस्ते याच्या गुन्हय़ांचा पाढाच वाचला. या गुन्हय़ातील ट्रक अद्याप जप्त करायचा आहे. हा ट्रक सध्या कुठे आहे, आरोपींनी तो कुणाला विकला आहे का? याची माहिती घेणे गरजेचे आहे. अर्थात यात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. तोडकरी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
आरोपीचा ट्रव्हल्स व्यवसायही!
एलसीबीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी विशाल घस्ते हा सराईत गुन्हेगार तर आहेच. पण, तो सध्या ट्रव्हल्सचा व्यवसायही करतो. त्यानिमित्त त्याचे सिंधुदुर्गात येणे-जाणे होत असते. 24, 25 जानेवारीच्या दरम्यान तो ट्रव्हल्स घेऊन सिंधुदुर्गात होता. त्याच दरम्यान त्याने झेंडे यांच्या ट्रकची टेहळणी करून ठेवलेली असावी.