प्रतिनिधी/ चिकोडी
मिनी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघा युवकांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटना कब्बूरनजीक निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर असलेल्या टोलनाक्मयानजीक शुक्रवारी रात्री घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26), प्रमोद करेप्पा नाईक (वय 26) अशी मृत युवकांची नावे आहेत. दोघेही हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील रहिवासी होते.
बेल्लद बागेवाडी येथील सिद्धार्थ आणि प्रमोद हे दोघे आपले कुलदैवत तवंदी येथे अमावास्येनिमित्त दर्शनासाठी दुचाकीने गेले होते. दरम्यान दर्शन घेऊन परतण्यास त्यांना उशीर झाला होता. कब्बूरनजीक निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर असलेला टोलनाका पार करताना पावसामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची समोरील लॉरीच्या मागील बाजूस जोराची धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीवरील प्रमोद आणि सिद्धार्थ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
चिकोडी पोलिसांनी माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, चिकोडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक कुळ्ळूर, साहाय्यक उपनिरीक्षक एस. सी. मठपती यांच्यासह सहकाऱयांनी भेट दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून या घटनेची नोंद चिकोडी पोलीस ठाण्यात झाली आहे. दोघा युवकांचा मृत्यू झाल्याने बेल्लद बागेवाडीत हळहळ व्यक्त होत असून यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून सोडणारा होता.