अमेरिकेत केवळ नऊ प्रांत ठरविणार नूतन अध्यक्ष : परिणाम मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता
अमेरिकेत विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे स्पर्धक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डेमॉपेटिक पक्षाचे ज्यो बायडन यांच्यातील चुरस अत्याधिक उत्कंठावर्धक स्थितीत येऊन पोहोचली आहे.नऊ प्रांतांच्या निकालांवर भावी अध्यक्ष कोण, हे ठरणार आहे. या नऊ राज्यांमध्येही सर्वाधिक चुरस केवळ तीन प्रांतांमध्येच आहे. दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला असून न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केल्याने या निवडणुकीचा अंतिम परिणाम न्यायालयातूनच मिळणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. भारतासह सारे जग या निवडणुकीकडे श्वास रोखून पहात आहे.
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना, पेन्सिलव्हानिया, मिशिगन, अलास्का, मेन, व्हिस्कॉन्सिस, ऍरिझोना आणि नेवाडा या प्रांतांचे परिणाम बुधवारी रात्री उशिरापर्यंत घोषित करण्यात आले नव्हते. ऊर्वरित सर्व 41 प्रांत आणि 1 जिल्हा यांचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ज्यो बायडन हे 225 निवड मतांसह आघाडीवर आहेत. तर ट्रम्प यांना आतापर्यंत 213 निवड मते मिळाली आहेत.
बायडन आघाडीवर, पण…
बायडन आघाडीवर असले तरी, ज्या 5 राज्यांमध्ये ट्रम्प रात्री उशिरापर्यंत आघाडीवर होते, त्या राज्यांची एकंदर निवड मते 70 इतकी आहेत. तर बायडन ज्या 4 प्रांतांमध्ये आघाडीवर होते तेथे 29 निवड मते आहेत. त्यामुळे या सर्व प्रातांमध्ये हेच कल अखेरपर्यंत राहिल्यास अद्यापही ट्रम्प यांना विजयाची संधी आहे. मात्र, यापैकी काही प्रांतांमध्ये बायडन यांना शेवटच्या क्षणी आघाडी मिळाल्यास तेही पारडे फिरवू शकतात, अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.
अशी होते निवडणूक…
अमेरिकेत अध्यक्ष थेट मतदारांकडून निवडला जात नाही. या देशातील प्रत्येक प्रांताला विशिष्ट संख्येने निवडवृंद सदस्य (इलेक्ट्रोरल कॉलेज मेंबर्स) निर्धारित करून दिलेले असतात. ज्या प्रांतात ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या प्रांतातील सर्व निवडवृंद मते त्या पक्षाच्या प्रतिस्पर्ध्याला मिळतात. अशी संपूर्ण अमेरिकेत 538 निवडवृंद मते आहेत.
त्यापैकी जो प्रतिस्पर्धी कमीत कमी 270 मते मिळवेल तोच अध्यक्ष म्हणून घोषित केला जातो, अशी तेथील पद्धत आहे. त्यामुळे एकंदर राष्ट्रीय मते कमी मिळालेला प्रतिस्पर्धीही अध्यक्ष होऊ शकतो.
केव्हा येणार परिणाम
संपूर्ण अमेरिकेत आणि जगातही हाच प्रश्न उत्सुकतेने विचारला जात आहे. पण अंतिम परिणाम येण्यास आणखी एक आठवडाही लागू शकतो. कारण काही राज्यांनी टपाल मतांना निवडणूक कार्यालयात पोहचण्यासाठी 10 नोव्हेंबर किंवा 12 नोव्हेंबरपर्यंत कालावधी दिला आहे. जर अतिशय चुरशीची निवडणूक झाली आणि या टपाल मतांच्या गणनेवरच अंतिम परिणाम ठरेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर, अमेरिकेचे नूतन अध्यक्ष कोण हे कमीतकमी आठवडय़ानंतरच समजणार आहे. काही निर्णायक राज्यांमध्ये मतगणना धिम्या गतीने होत आहे.
ट्रम्प यांची विजयाची घोषणा
मतगणनेचा कल स्पष्ट झाल्यानंतर ट्रम्प यांनी तेथील वेळेनुसार रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजय झाल्याची घोषणा केली होती. त्यावेळी पूर्ण मतगणना व्हायची होती. तथापि, त्यानंतर काही निर्णायक राज्यांमध्ये तीव्र चुरस असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे अनेक पत्रकार आणि दूरदर्शन सूत्रसंचालकांनी ट्रम्प यांच्यावर घाई केली म्हणून टीका केली.
बायडन यांचा संयमी सल्ला
आपण जिंकतो आहोत. पण पूर्ण मतगणना होईपर्यंत संयम बाळगा असा सल्ला बायडन यांनी आपल्या पक्षाच्या समर्थकांना दिला. मात्र, परिणामांचे चित्र स्पष्ट न झाल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांच्या उत्साहावर पाणी पडल्याचे दिसून आले.
भारताचेही लक्ष
या निवडणुकीसंबंधी भारतातही अतिउत्सुकता आहे. ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात काही स्थानी यज्ञ करण्यात आले होते, तर बायडन यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासाठी त्यांचे मूळ स्थान तामिळनाडूत देवाच्या प्रार्थना करण्यात आल्या होत्या.
प्रथमच इतका विलंब…
सर्वसाधारणतः अमेरिकेत मतगणनेच्या दिवशीच अध्यक्षीय निवडणुकीचे परिणाम घोषित होतात. तथापि गेल्या 124 वर्षांमध्ये प्रथमच मतगणनेच्या दिवशी परिणाम घोषित होणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या निवडणुकीच्या नावावर हा आणखी एक विक्रम नोंदविला गेल्याचेही स्पष्ट झाले.
मतदानाचा शतकातील विक्रम
अमेरिकेतील यंदाच्या अध्यक्षपद निवडणुकीत तब्बल 67.78 टक्के मतदान झाले आहे. हा गेल्या 112 वर्षांमधील विक्रम आहे. अमेरिकेत एकंदर मतदारांची संख्या 23.90 कोटी असून त्यापैकी साधारणतः 16 कोटी मतदारांनी मतदानाच्या अधिकाराचा उपयोग केला आहे. झालेल्या मतदानापैकी 9.5 कोटी मते टपालाद्वारे टाकण्यात आली आहेत. त्यामुळेच मतगणनेस विलंब होत आहे.
निर्णायक प्रांत आणि त्यांची स्थिती |
ट्रम्प आघाडीवर
प्रांत | निवड मते | मताधिक्क्य | मतगणनापूर्ती |
जॉर्जिया | 16 | 1.21 लाख | 92 टक्के |
उत्तर कॅरोलिना | 15 | 1.82 लाख | 95 टक्के |
पेन्सिलव्हानिया | 20 | 6.19 लाख | 75 टक्के |
मिशिगन | 16 | 27 हजार | 86 टक्के |
अलास्का | 03 | 80 हजार | 36 टक्के |
बायडन आघाडीवर
मेन | 2 | 80 हजार | 72 टक्के |
व्हिस्कॉन्सिस | 10 | 21 हजार | 93 टक्के |
ऍरिझोना | 11 | 1.31 लाख | 82 टक्के |