ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात 15 ऑक्टोबरला होणारी दुसरी अध्यक्षीय चर्चा रद्द करण्यात आली आहे.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी एका तटस्थ आयोगाकडून उमेदवारांमध्ये चर्चा आयोजित करण्यात येतात. ट्रम्प आणि बायडेन यांच्यात पहिली चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली.
ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दुसरी चर्चा व्हर्च्युअल पद्धतीने होणार होती. मात्र, ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त करत आपण या चर्चेत सामील होणार नसल्याचे सांगितले होते. तर सुरक्षेच्या मुद्द्यावरून बायडेन यांनीही चर्चेसाठी नकार दिला. त्यामुळे तिसऱ्या चर्चेकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे. 22 ऑक्टोबरला टेनेसीच्या नॅशविल येथे तिसरी चर्चा होणार आहे.