फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रम्प असे नाव
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्वतःचा नवा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सादर केला आहे. याचे नाव त्यांनी फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रम्प असे ठेवले आहे. हे त्यांच्या संकेतस्थळाचाच एक हिस्सा आहे. ट्रम्प यांचे प्रवक्ते जेसन मिल्लर यांनी याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
6 जानेवारी रोजी कॅपिटॉल हिंसाचाराच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर फेसबुक, ट्विटर समवेत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी बंदी घातली होती. तर ट्रम्प यांचे हे कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाकडून बंदी घालण्यात आल्यावर सादर केले गेल्याचे फॉक्स न्यूजने म्हटले आहे.
हे एक उत्तम प्लॅटफॉर्म असून यात ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घडामोडी आणि नव्या विधानांविषयी जाणून घेता येणार आहे. हे त्यांचे नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही. भविष्यात याच्याशी निगडित माहिती पुरविणार आहोत. स्ट्रेट फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रम्प नावाने एक चित्रफित यावर प्रसारित करण्यात आल्याची माहिती मिल्लर यांनी दिली आहे.
संकेतस्थळावर ट्रम्प यांचे एक निवेदनही प्रसारित करण्यात आले आहे. हे निवेदन 20 जानेवारी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी लिहिले होते. प्लॅटफॉर्ममध्ये कॅमेरा फीचर देखील आहे. यामुळे ट्रम्प चित्रफितरुपी संदेश देऊ शकणार आहेत. फेसबुकच्या संचालक मंडळाकडून ट्रम्प यांच्यावरील बंदी हटविण्याच्या मुद्दय़ावर चर्चा होणार असताना हे प्लॅटफॉर्म सादर करण्यात आले आहे.