ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा आपला मनसुबा नाही, असे म्हणत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे.
नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याची गरज ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. तसेच टपाली मतांची मोजणी करण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. त्यात गैरप्रकारही होऊ शकतात. त्यामुळे ही स्थिती टाळण्याची गरज आहे. अन्यथा ही बाब अमेरिकेसाठी लाजिरवाणी ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. निवडणूक पुढे ढकलण्याच्या ट्रम्प यांच्या कल्पनेला त्यांच्याच रिपब्लिकन पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा न मिळाल्याने ट्रम्प यांनी या वक्तव्यावरून घूमजाव केले.
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांचा तगडा मुकाबला आहे. जनमत चाचण्यांमध्ये बिडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.