जागतिक पातळीवरही नाराजीचा सूर व्यक्त
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील संसद भवनात ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराबाबत बोलताना नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संताप व्यक्त करत ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. हिंसाचार घडवून आणणाऱया ट्रम्प समर्थकांना त्यांनी राजद्रोही असे म्हटले आहे. तर दुसरीकडे अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) प्रतिनिधी सभेच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी यांनी ‘जर ट्रम्प यांच्यावर 25 व्या घटानादुरुस्तीनुसार राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले नाही तर अमेरिकन संसद महाभियोगाची कार्यवाही करु शकते.’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्याविरोधात आवाज तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेच्या कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये झालेला हिंसाचार अमेरिकेसाठी भयावह, निंदनीय आणि विरोधाभासी असल्याच्या प्रतिक्रिया जागतिक पातळीवरूनही व्यक्त झाल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासकीय पातळीवरही याबाबत नाराजीचा सूर स्पष्टपणे व्यक्त होत आहे. प्रतिनिधीगृहात गुरुवारी झालेला हिंसाचार अस्विकारार्ह असून कायदा आणि नियम तोडणाऱया लोकांवर कारवाई व्हायलाच हवी, असे मत व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव कायले मैकनेनी यांनी व्यक्त केले आहे.