वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इस्रायल आणि अरब देशांदरम्यान होत असलेल्या करारांमध्ये आता सूदानचेही नाव सामील झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर सूदान आणि इस्रायल यांच्यातील संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक करार झाला आहे. या करारानंतर ट्रम्प यांनी सूदानला दहशतवाद पुरस्कृत करणाऱया देशांच्या यादीतून वगळले आहे.
सूदानला दहशतवादाच्या यादीतून वगळल्याबद्दल पंतप्रधान अब्दुल्ला हमदोक यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या या कराराला अध्यक्ष ट्रम्प यांच्या विदेश धोरणाचे यश म्हणून पाहिले जात आहे. सौदी अरेबियाही इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्याची अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या करारावर टीका केली आहे. पॅलेस्टाइनच्या वतीने बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही असे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनने इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. मागील 26 वर्षांमध्ये इस्रायलला मान्यता देणारे हे पहिले दोन आखाती देश ठरले आहेत. सूदान, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त वक्तव्यानुसार आगामी आठवडय़ात एक शिष्टमंडळ स्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे.
सूदान अन् इस्रायल संबंध
1948 मध्ये इस्रायलच्या स्थापनेपासूनच सूदानचे त्याच्यासोबतचे संबंध शत्रुत्वाचे राहिले आहेत. सूदानने 1948 आणि 1967 मध्ये इस्रायलच्या विरोधात युद्धही लढले होते. पॅलेस्टाईनच्या वतीने लढणाऱयांसाठी सूदान नंदनवन मानले जात होते. परंतु सूदानमध्ये मागील वर्षी 3 दशकांपासून सत्तेवर असलेल्या ओमर अल-बशीर यांना पद सोडावे लागले होते आणि त्यांची जागा नागरी-सैन्य परिषदेने घेतली होती. तेव्हापासूनच इस्रायलसोबतचे संबंध सुधारण्यास प्रारंभ झाला होता.