ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या 18 प्रचार रॅलींमुळे 30 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर त्यामधील 700 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्ष अहवालातून ही बाब समोर आली आहे.
स्टॅनफोर्डच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी 20 जून ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत 18 निवडणूक प्रचार रॅली काढल्या. या रॅलींमध्ये सहभागी असणाऱ्या जवळपास 30 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर 700 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
अमेरिकेत आतापर्यंत 94 लाख 73 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 2 लाख 36 हजार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, ट्रम्प यांना त्याचे गांभीर्य नाही. ज्यांना आपले समर्थक आणि जनतेची चिंता नाही, ते सामान्य नागरिकांची काय चिंता करणार ? अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी केली आहे.