ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये ‘रिसिन’ नावाचे घातक विष असलेले पाकीट पाठवणाऱ्या महिलेला न्यूयॉर्क-कॅनडा सीमेवर कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अटक केली.
मागील चार दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या नावे संबंधित महिलेने ‘रिसिन’ नावाचे घातक विष असलेले पाकीट पाठवले होते. हे पार्सल ट्रम्प यांच्याकडे पोहचण्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी ते 2 वेळा तपासले. त्यामध्ये हे कारस्थान उघड झाले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि सिक्रेट सर्व्हिस या प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान, अमेरिका सीमा संरक्षण अधिकाऱ्यांनी या महिलेला बफेलो येथे पीस ब्रिज सीमा ओलांडताना ताब्यात घेतले आहे.
काय आहे रिसिन?
रिसिन हा एक विषारी पदार्थ आहे, जो एरंडेलच्या बियांमधून निघतो. हे विष शरीरात गेले तर त्या व्यक्तीला उलट्या सुरु होतात. तसेच पोटात आणि आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होतो. त्यामुळे किडनी फेल होऊ शकते.