ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात 2024 मध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मी पुन्हा लढविण्यास इच्छुक आहे. कमला हॅरिस या देखील यावेळी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमधील ईस्टरुममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बायडेन बोलत होते. ते म्हणाले, मला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये मी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढेन. माझ्या सहकारी कमला हॅरिस यादेखील पुन्हा उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही 2024 मध्ये आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे बायडेन विरोधात ट्रम्प अशी निवडणूक होऊ शकते.
दरम्यान, बायडेन यांचे वय 78 असून ते सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचा वार्षिक पगार जवळपास 4 लाख अमेरिकन डॉलर एवढा आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही रक्कम 2 कोटी 92 लाख रुपये होते.