टेरोबा
ब्रॅव्हो बंधूंच्या तसेच पोलार्डच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हिरो पुरस्कृत कॅरेबियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्सने सलग नववा विजय नोंदविताना सेंट लुसिया झोयुक्सचा 23 धावांनी पराभव केला. शनिवारच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रिन बॅगो नाईट रायडर्सने 20 षटकांत 5 बाद 175 धावा जमविल्या. ट्रिनबॅगोतर्फे डरेन बॅव्होने 42 चेंडूत 50 तर पोलार्डने 42 धावा जमविल्या. डरेनचा मोठा भाऊ ड्वेन ब्रॅव्होने सेंट लुसियाच्या डावात 2 तर कर्णधार पोलार्डने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट लुसिया झोयुक्सने 20 षटकांत 7 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली.
या सामन्यासाठी ट्रिनबॅगो संघाने सुनील नरेनला विश्रांती दिली होती. ट्रिनबॅगोच्या डावाला सिमन्स आणि वेबस्टर यांनी सावध सुरूवात केली. वेबस्टरने पहिल्या षटकांत षटकार खेचला पण दुसऱया षटकांत नबीच्या गोलंदाजीवर सिमन्स 4 धावांवर झेलबाद झाला. वेबस्टरने नबीच्या या षटकांत आक्रमक फटकेबाजी केली. नबीने या षटकांत 13 धावा दिल्या. सिफर्टने फ्री हिटवर षटकार खेचला. पॉवर प्लेअखेर ट्रिनबॅगोने 1 बाद 47 धावा जमविल्या होत्या. सेंट लुसियाच्या रॉस्टन चेसने आपल्या एका षटकांत पाच वाईड चेंडू टाकत 10 धावा दिल्या. 10 षटकाअखेर ट्रिनबॅगोने 2 बाद 74 धावा जमविल्या होत्या. ट्रिनबॅगो संघाने शेवटच्या चार षटकांत 54 धावा झोडपल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट लुसिया संघाच्या डावाला सावध सुरूवात झाली. पहिल्या चार षटकांत सेंट लुसियाने केवळ 13 धावा जमविल्या. 10 व्या षटकाअखेर सेंट लुसिया 1 बाद 63 धावापर्यंत मजल मारली होती. ड्वेन ब्रॅव्हो आणि पोलार्ड यांच्या अचूक गोलंदाजीसमोर सेंट लुसियाला 20 षटकांत 152 धावापर्पंय मजल मारता आली. ट्रिनबॅगो नाईट रायडर्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून गयाना अमेझॉन वॉरियर्स दुसऱया स्थानावर आहे. या दोन संघांमध्ये 6 गुणांचा फरक आहे. सेंट लुसिया गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक : ट्रिनबॅगो नाईट रायडर्स 20 षटकांत 5 बाद 175 (डरेन ब्रॅव्हो 50, पोलार्ड 42), सेंट लुसिया झोयुक्स 20 षटकांत 7 बाद 152 (पोलार्ड 3-35, ड्वेन ब्रॅव्हो 2-26).