वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
हिरो पुरस्कृत कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. रविवारच्या सामन्यात ट्रिनबॅगोने सेंट किट्स आणि नेव्हीस पेट्रीऑट्सचा 9 गडय़ांनी पराभव केला. ट्रिनबॅगो संघाने आपले सर्व म्हणजे 10 सामने जिंकून विक्रम केला. ट्रिनबॅगोच्या फवाद अहमदला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. आता या स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स, जमैका, सेंट लुसिया आणि गयाना या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स संघाचा डाव 19 षटकांत 77 धावांत आटोपला. सेंट किट्सच्या रामदिनने 19, इमारिटने 15, लेवीसने 12 धावा जमविल्या. ट्रिनबॅगोच्या फवाद अहमदने 21 धावा 4, हुसेनने 25 धावांत 2 तर फिलीप, रझा, तांबे आणि अली खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर ट्रिनबॅगो नाईट रायडर्सने 20 षटकांत 1 बाद 78 धावा जमविल्या. ट्रिनबॅगो संघातील वेबस्टरने नाबाद 41, जंगूने 19, सिफर्टने नाबाद 16 धावा जमविल्या. सेंट किट्सतर्फे इमेरिटने 14 धावांत 1 गडी बाद केला.
दुसऱया एका सामन्यात सेंट लुसिया झोयुक्सने जमैका तेलवाहचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसियाने 20 षटकांत 6 बाद 145 धावा जमविल्या. नजीबुल्लाने 35, चेसने नाबाद 32, मुजीबने 32 धावा जमविल्या. जमैकातर्फे लेमिचेनी, एडवर्डस् आणि पेरामॉल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर जमैका संघाने 20 षटकांत 9 बाद 134 धावा जमविल्या. फिलीप्सने 49, किरटॉनने 25, ब्लॅकवूडने 25 धावा जमविल्या. सेंट लुसियातर्फे ग्लेन तसेच झहीर खान यांनी प्रत्येकी तीन तर विलीयम्सने 2 गडी बाद केले. या सामन्यात झहीर खानला सामनावीर महणून घोषित करण्यात आले.