प्रतिनिधी / जयसिंगपूर
शहरातील प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका आसावरी आडके यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून आपल्या प्रभागात औषध फवारणी करुन नागरीकांमध्ये प्रबोधन करत आहेत. स्वखर्चातून त्या हे काम करत असताना बेरोजगारांना यातून त्यांनी रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. प्रभागातील स्वच्छतेसाठी त्यांनी चार कामगारांचाही पगार स्वखर्चाने दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर मोठी जबाबदारी पडली असून यातून पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नगरसेविका आडके यांचे कार्य पालिकेचाही भार हालका करणारे ठरले आहे.
माजी उपनगराध्यक्ष, यांनीआपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील सहाशे जणांना मास्क वाटप केले आहे. शिवाय जयसिंगपूर पोलिस ठाण्यातही त्यांनी पोलिसांना मास्क आणि कोरोनापासून बचावाचे साहित्य दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पालिकेच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र मनुष्यबळाचा विचार करता सर्वच प्रभागात त्याच गतीने हि मोहीम पुढे चालू ठेवण्यासाठी सौ. आडके यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागात औषध फवारणी सुरु केली आहे.
गुरुवारी सकाळी त्यांनी ट्रॅक्टरचा ताबा घेऊन प्रभागात औषध फवारणीला प्रारंभ केला. माजी उपनगराध्यक्ष शिवरुद्र आडके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शंकर नाळे, सागर मादनाईक, महेश लवटे, किरण फडतारे, मिलींद साखरपे, सतीश हेगाणा, विठ्ठल मोरे, रोटरीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते. सौ. आडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील स्वच्छतेसह जनजागृतीवर विशेष भर दिला आहे.